कन्नड, (प्रतिनिधी): शिरोडी येथील श्री महालक्ष्मी माता बहुउद्देशीय संस्था संचलित ज्ञानदा कौशल्य विकास संस्थेच्या (आयटीआय) द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी (दि. १०) उत्साहात पार पडला. केवळ निरोप न देता, १०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांच्या ज्ञानाची शिदोरी देऊन संस्थेने एक आदर्श उपक्रम राबवला.
अध्यक्षस्थानी जयलक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणपतराव पवार होते. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी यशस्वी उद्योजक होण्याचा कानमंत्र दिला. विनायकराव पाटील पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य संतोष मतसागर यांनी उच्च शिक्षणातील संधींची माहिती देऊन संधीचे सोने करा असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष विलास इंगळे यांच्या संकल्पनेतून इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना विद्युत सहायक व
महापारेषण, तर डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवक भरतीची पुस्तके भेट देण्यात आली.
प्राचार्या अमृता इंगळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, सचिव दीपक वारे, संभाजी मोहिते, नानासाहेब पवार, चिंचखेड्याचे उपसरपंच ज्ञानेश्वर काळे, भगवान काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेंद्र राहणे यांनी सूत्रसंचालन केले. आशिष मोरे यांनी आभार मानले.













